56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी आजपासून गोव्यात सुरू होत आहे. द ब्लू ट्रेल या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. येत्या 28 तारखेपर्यंत हा महोत्सव चालेल. या महोत्सवा दरम्यान 13 विश्व प्रीमियर आणि आणि 46 एशिया प्रीमियर होतील. सर्वश्रेष्ठ चित्रपटासाठी सुवर्ण मयुर पुरस्कारासह ४० लाख रुपयांची रोख बक्षीसं दिली जातील. यावर्षी जपान केंद्रस्थानी आहे तर स्पेन भागीदार राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे.
तर ऑस्ट्रेलिया स्पॉट लाईट देश म्हणून आमंत्रित आहे. यावेळी प्रथमच एआय फिल्म हॅकेथॉन आयोजित केली जात आहे. चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवकल्पनांचा शोध आणि चित्रपटाचा प्रभाव वाढविण्यासाठी एआयचा एक साधन म्हणून वापर करण्यासाठी 48 तासांची स्पर्धा आयोजित केली जात आहे. तसंच यंदा युनिसेफ बरोबर भागीदारी करण्यात आली असून, मुलांच्या भावविश्वावर आधारित पाच विशेष चित्रपट यावेळी दाखविण्यात येणार आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 80 पेक्षा जास्त देशातील पाहुणे, चित्रपट निर्माते, आणि 270 हून जास्त चित्रपटांचा सहभाग आहे.