अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी, जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवलं आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर या संस्थेनं यासंबंधीची २०२५ या वर्षासाठीची यादी अलिकडेच जाहीर केली. त्यात अमूलनं पहिलं तर इफकोनं दुसरं स्थान पटकावलं. दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाअंतर्गतच्या कामगिरीच्या आधारावर या कंपन्यांनी हे यश प्राप्त केलं.
अमूलनं ग्रामीण भागाची आत्मनिर्भरता आणि सामूहिक मालकीच्या भावनेनं काम करत लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं आहे, तर इफकोनं शाश्वत खत उत्पादन, डिजिटल व्यासपीठांची सुविधा आणि पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातनं लाखो शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात योगदान देत, सहकार्याच्या तत्त्वाला खऱ्या अर्थानं मूर्त रूप दिलं आहे. या दोन्ही कंपन्यांच्या या अपदावात्मक कामगिरीची दखल या क्रमवारीतून घेतली गेली आहे.
या यशासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन्ही कंपन्यांचं अभिनंदन केलं आहे. हे यश म्हणजे अमूलशी जोडलेल्या लाखो महिलांच्या अथक समर्पणाचा आणि इफकोत योगदान दिलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव आहे. हे यशातून सहकार क्षेत्राच्या अमर्याद क्षमतांची प्रचिती येते असं त्यांनी म्हटलं आहे.