सिक्कीममध्ये हिवाळी खेळ म्हणून आइस हॉकी सुरू करण्याची योजना आखण्यात आहे. पूर्व सिक्कीममधील ग्नाथंग व्हॅलीमध्ये नैसर्गिक आइस रिंक उभारण्याची तयारी सुरू आहे. ही सुविधा पुढील हिवाळ्यापर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. गंगटोकचे जिल्हाधिकारी तुषार निखारे, सिक्कीम माउंटनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कुन्झांग ग्यात्सो भुतिया यांनी सिक्कीम सरकारचा क्रीडा विभाग आणि आइस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाच्या समन्वयानं आइस हॉकी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सिक्कीममधील हिवाळ्याच्या परिस्थितीत इतर हिमालयीन राज्यांच्या तुलनेत जास्त वेळ खेळता येतं, तसंच सिक्कीमचा भूप्रदेश आणि हवामान लडाखमधील सुरुवातीच्या टप्प्यातील आइस हॉकीच्या वातावरणाशी मिळतंजुळतं आहे. या उपक्रमामुळे तरुणांना राष्ट्रीय स्तरावरील हिवाळी खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, असं लडाखचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक गुलाम मुस्तफा यांनी सांगितलं.