पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ICC चँपियन्स करंडक 2025 साठी संयुक्त अरब अमिरात देशाची निवड

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी,तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळले जाणार आहेत. त्या देशात कोणत्या ठिकाणी हे सामने होणार हे पाकिस्तान क्रिकेट मंडळानं स्पष्ट केलं नसलं, तरी दुबईमध्ये हे सामने होतील, अशी शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीसाठी स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे