मुंबई शहर आणि परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येतील असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गिरणी कामगार संघटना प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत कामगारांना घरं देण्याबाबत विविध निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शेलू इथली घरं घेण्यासाठी गिरणी कामगारांवर कुठलीही सक्ती करण्यात आलेली नाही, हे सामंत यांनी स्पष्ट केलं. गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घरं मिळवून देण्यासाठी कोटा तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
नागरिकांना आवास योजनेंतर्गत राज्यभरात उपलब्ध असलेल्या सर्व घरांची माहिती सुलभरीत्या एकाच ठिकाणी मिळावी यासाठी ‘महाआवास’ हे विशेष ॲप विकसित केलं जात असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी काल लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. यामुळे लाभार्थ्यांना स्वतःच्या पसंतीनुसार घर निवडून ऑनलाइन नोंदणी करता येईल, असंही ते म्हणाले.