जगभरात आर्थिक घसरणीची चिंता व्यक्त होत असताना भारताच्या आर्थिक विकासदरात मोठी वाढ होत असून महागाईचा दर घसरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यमानं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.
जगभरात अनिश्चित वातावरण असताना भारत स्थिर आणि मजबूत आहे. जगभरातले देश एकमेकांवर विश्वास ठेवायला मागे-पुढे पाहत असताना भारत हा विश्वासार्ह पर्याय म्हणून सर्वांच्या मदतीला येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भारताने कोणत्या देशाशी कसे संबंध ठेवावेत हा भारताचा अधिकार असून यात इतर कोणताही देश हस्तक्षेप करू शकत नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी या परिषदेत स्पष्ट केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीमुळे भारत-अमेरिका संबंधांवर विपरित परिणाम होण्याच्या शक्यता जयशंकर यांनी फेटाळून लावल्या. अमेरिकेशी विसंवाद असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या. सगळ्या देशांशी चांगले संबंध असणं भारतासाठी महत्त्वाचं असल्याचं जयशंकर म्हणाले.
आयकरानंतर सीमा शुल्क यंत्रणेत मोठ्या सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला.