पावसाच्या संततधारेमुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल जोगिंदरनगर, कसौली आणि पांवटा साहिब गावात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातल्या सर्व मोठ्या नद्यांना पूर आला आहे तसंच धरणांतूनही नियमितपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे 129 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे आतापर्यंत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. नागरिकांनी नदीजवळ जाऊ नये, अनावश्यक पर्यटन टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. हा संपूर्ण आठवडा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.