उत्तराखंडमध्ये देहरादून इथे सहस्त्रधारा भागात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य करून १०० जणांना सुरक्षितपणे वाचवलं. संततधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात रस्ते आणि पुलांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बाधित जिल्ह्यांची पाहणी करून बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मदत साहित्य, सुरक्षित निवारा, अन्न, स्वच्छ पाणी आणि आरोग्य सेवा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुष्करसिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून उत्तराखंडमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. या कठीण प्रसंगात उत्तराखंडाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मोदी आणि शहा यांनी दिलं. दरम्यान, हवामान विभागाने आज देहरादून, नैनिताल आणि चंपावत या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हिमाचल प्रदेशातही संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिमला इथे काल १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले आहेत. हिमलँड, कच्चीघाटी आणि बीसीएल परिसरात दरड कोसळल्यामुळे १० वाहनांचं नुकसान झालं. संततधार पावसामुळे राज्यातले नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातले ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ६५० रस्ते बंद झाले आहेत. पाणी आणि वीजपुरवठाही खंडित झाला आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.