बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत आणखी वायव्य दिशेला सरकेल, आणि येत्या मंगळवारपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडा जवळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढले दोन ते चार दिवस पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओदिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा अंदाज आहे.
या भागातल्या मच्छिमारांनी येत्या २९ ऑक्टोबर पर्यंत खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, तसंच मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांनी ताबडतोब माघारी यावं असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.