महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाट आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. गोंदिया जिल्ह्यात संततधारेमुळे अनेक भागांतल्या नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह पाच धरणांतून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जवळच्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून भोगावती आणि पंचगंगा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प ९३ टक्के भरला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे.
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.