राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसानं पुणे, नाशिक, लातूर, सातारा आणि रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठयामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून काल दुपारपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला असून पुणे महापालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड, सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाने अनेक नदी, नाले ओढे दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे आसपासच्या गावांशी संपर्क तुटल्याच्या घटनाही अनेक जिल्ह्यांमध्ये घडल्या. नाशिक जिल्ह्यातही नद्यांना पूर आला असून एकजण पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
येत्या 24 तासात मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे आणि सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे.