येत्या वर्षात कर्करोगाच्या उपचारांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार असून, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काल महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. शासकीय कर्करोग रुग्णालयातल्या ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचं आणि कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत इमारतीचं लोकार्पण करताना ते बोलत होते.
कर्करोगाचं निदान वेळेवर आणि लवकर करण्यासह ९० टक्के रुग्णांवर एक महिन्याच्या आत उपचार सुरू करण्यात आल्याचंही नड्डा यांनी सांगितलं. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून २०० निगा केंद्रं उभारली जाणार आहेत. निदान क्षमता वाढवल्यानं मुखाचा कर्करोग, महिलांमधला स्तनांचा कर्करोग यांचं वेळेत निदान झाल्यानं वेळेत उपचार सुरू होऊ शकल्याची माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली.