उत्तराखंडमधे हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला. उच्च दाबाची विजेची तार दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीवर कोसळून ही दुर्घटना झाली. उत्तराखंड पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, आणि इतर यंत्रणांची पथकं बचावकार्य करीत आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. तसंच जखमी झालेल्यांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आपण स्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत असं त्यांनी सांगितलं. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्थसहाय्य धामी यांनी जाहीर केलं असून दुर्घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश दिले आहेत.