देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात या अभियानाअंतर्गत पालिकेच्या क्रीडा विभागानं तिरंगा दौड आयोजित केली होती. यात शालेय विद्यार्थी, धावपटूंनी भाग घेतला. यावेळी ३० फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी आणि उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. याखेरीज तिरंगा ध्वज, राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनासंबंधी आवश्यक इतर वस्तू तसंच तिरंगा संकल्पनेपासून प्रेरित विविध वस्तूंचं विक्री प्रदर्शनही ठेवण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यात आज हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच महापालिका अधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला.