येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरात हरघर तिरंगा या मोहिमेसह अन्य उपक्रम राबवण्यात येत आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा देशभक्तीपर चित्रपटांचा महोत्सव आजपासून मुंबई तसंच नवी दिल्ली इथे सुरू झाला. भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाला निःशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या १३ तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार असून या महोत्सवाचं उद्दिष्ट राष्ट्रभक्तीला सन्मान देणं हे आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका येत्या बुधवारी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवणार आहे. तसंच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते माजी सैनिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भव्य मानवी साखळी आणि विशाल राष्ट्रध्वज झळकवण्याचा कार्यक्रम पार पडला. हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने वाशीम शहरातल्या भटक्या समाजाच्या नागरिकांनीही आपल्या पालावर आज तिरंगा फडकावला. हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम माळवटकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या भक्त निवासात शासकीय योजनांची माहिती देणारं मल्टिमीडिया प्रदर्शन सुरू झालं आहे. हे प्रदर्शन केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे.