हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्याच्या नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. अनेक ठिकाणी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सकाळी अभिषेक, भजन, कीर्तन, आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सांगलीतल्या पंचमुखी मारुती मंदिरात विविध फळापासून सजावट केली आहे.
नागपूरमध्ये हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली आहे. तेल, शेंदूर अर्पण करण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. हनुमान जन्मोत्सवानिमित्त नागपुरात राजाबाक्षा आणि गिट्टीखदान इथल्या मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये प्रथेप्रमाणे महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी केली.
गोंदियात शयन मुद्रेतल्या हनुमान मंदिरात दर्शना करता गर्दी झाली आहे.
धुळे शहरात सर्वच हनुमान मंदिरांत आज पहाटे पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. धुळे शहरातल्या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात आज जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.