गाझापट्टीत युद्ध थांबवण्यासाठी आणि ओलिसांविषयी तोडगा काढण्यासाठी इजिप्तच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी हमासचं शिष्टमंडळ खलील अल हया यांच्या नेतृत्वाखाली काल कैरो इथं पोहोचलं. साठ दिवसांच्या प्रस्तावित युद्धविरामाची अमलबजावणी करणं हा या वाटाघाटीचा हेतू आहे.
इजिप्तच्या मध्यस्थीने ठेवलेल्या प्रस्तावात युद्धबंदी, गाझापट्टीतून सैन्य माघार, हमासच्या कैदेतील सर्व ओलिसांची सुटका आणि हमासच्या काही सदस्यांची हद्दपारी या अटी ठेवण्यात आल्या आहेत. या वाटाघाटींना अमेरिका आणि कतारचा पाठिंबा आहे. हमासच्या ताब्यातल्या ओलिसांची आणि पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करून युद्ध थांबवणं आणि कोणत्याही अटीशिवाय गाझापट्टीत मदत सुरू करणं हे चर्चेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं इजिप्तचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बद्र अब्देल आती म्हणाले.
दरम्यान, युद्धबंदीची शक्यता इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामीन नेतन्याहू यांनी फेटाळली आहे. हमासचा पराभव करून ओलिसांची सुटका करणं हेच अंतिम उद्दिष्ट असल्याचं नेतन्याहू यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितलं. गाझा शहरात लष्करी मोहीम तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.