राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी करून अ श्रेणीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. नवी दिल्ली इथल्या भारत मंडपममध्ये काल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांना कृषी आणि बिगर-कृषी क्षेत्रातल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
‘आंब्यांचा राजा’ म्हणून जगभर ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला. कृषी क्षेत्रात अ श्रेणी अंतर्गत जिल्ह्यानं प्रथम स्थान मिळवलं. नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी द्वितीय स्थान, तर अमरावती जिल्ह्यानं आपल्या मँडरीन संत्र्यांसाठी तृतीय स्थान मिळवलं.
विशेष उल्लेखनीय पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रात अ श्रेणीमध्ये नाशिक जिल्ह्याला द्राक्ष आणि मनुकांसाठी, आणि बिगर कृषी क्षेत्रात ब श्रेणीमध्ये अकोला जिल्ह्याला कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी गौरवण्यात आलं.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थित पुरस्कारांचं वितरण झालं.