भारतीय नागरिकांना एच वन बी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या याकरता अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. व्हिसाकरता विलंब होतो, मुलाखतींची वेळ बदलली जाते, या आणि अशा इतर अडचणींमुळे भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास होत असल्याचं विशेषतः त्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याचं वेळोवेळी अमेरिकेच्या संबंधित विभागांना पत्र लिहून कळवलं आहे, असं ते म्हणाले.
बांगला देशात अल्पसंख्य समाजाचा छळ होत असल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे असं त्यांनी सांगितलं. या घटनेतल्या गुन्हेगारांना न्यायालयासमोर आणून शिक्षा केली पाहिजे असं ते म्हणाले. बांगला देशातल्या विद्यमान सरकारच्या काळात अल्पसंख्यकांवर हल्ल्याचे दोनहजार ९०० गुन्हे नोंदले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. बांगला देशात मुक्त, न्याय्य, समावेशक निवडणूक व्हावी अशीच भारताची भूमिका असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
कॅनडात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी भारतीय अधिकारी त्याच्या कुटुंबाशी तसंच स्थानिक प्रशासनाबरोबर संपर्कात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.