गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आणंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता.
अपघात झाल्यानंतर बडोदा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचावकार्य हाती घेतलं असून, स्थानिक नागरिकही त्यांना मदत करत आहेत. आणंद इथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाहनांची वाहतूक सुरू असताना हा पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती बडोदाचे जिल्हाधिकारी अनिल धमोलिया यांनी दिली. दरम्यान, NDRF ची पथक अपघातस्थळी दाखल झाले असून ते देखील मदतकार्यात सहभागी झाले आहेत. हा पूल नेमका कशामुळे कोसळला याचा तपास करण्यासाठी गुजरात सरकारनं तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरात राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.