डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज

वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं.

 

जीएसटीतल्या सुधारणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. जीएसटी दरकपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा नवरात्रीदरम्यान विक्रीत विक्रमी वाढ झाली असून गेल्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री २५ टक्क्यांनी वाढल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले.

 

अप्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात सरकारनं केलेल्या या सुधारणांमुळे देशात होणारी गुंतवणूक, उद्योग व्यापारातली उलाढाल, पायाभूत सुविधांवर होणार खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या या खूप मोठ्या सुधारणा असल्याचं पीयूष गोयल म्हणाले. 

 

जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर मजबूत आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही आर्थिक वृद्धीचा अंदाज सुधारून ६ पूर्णांक ६ दशांश टक्के केला आहे, असंही पीयूष गोयल यांनी सांगितलं.