वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत, हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे. ऐकूया इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या बदलांच्या परिणामाबद्दल….
नव्या कररचनेनुसार एअर कंडीशनर, डिशवॉशर तसंच एलसीडी आणि एलईडी दूरचित्रवाणी संचावरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना या वस्तू परडवण्याजोग्या दरात उपलब्ध होणार असून देशातल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. नव्या कररचनेमधे छोट्या कार आणि दुचाकीवरील जीएसटी देखील कमी झाला आहे. ३५० सीसी पर्यंतच्या दुचाकींवरील जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के झाला आहे. १२०० सीसी खालील पेट्रोल कार तसंच १५०० सीसी खालील डिझेल कारवरील जीएसटीही १८ टक्के करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांना वाहन घेणं शक्य होणार असून याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदी करून लघु-मध्यम उद्योग, देशांतर्गत उद्योग, स्थानिक कारागीर यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.