वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. करकपातीचा युवा वर्गाला फायदा होणार आहे.
व्यायामशाळा, फीटनेस सेंटर यांच्यावरचा जीएसटी १८ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय तरुण, तसंच चाकरमान्यांसाठी व्यायामाची साधनं सहज उपलब्ध होतील. केंद्र सरकारच्या फीट इंडिया चळवळीला प्रोत्साहन मिळेल आणि नागरिक आरोग्यदायी जीवन जगतील. दुचाकींवरचा जीएसटी २८ वरून १८ टक्के झाल्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय, छोट्या व्यावसायिकांना दुचाकी घेणं परवडेल. गिग वर्कर्सना दुचाकीची गरज सर्वाधिक असते.
जीएसटी दर कमी झाल्यामुळे गिग वर्कर्सना कमी किमतीत दुचाकी मिळतील आणि त्यांच्या पैशाची बचत होईल. छोट्या कारवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे निमशहरी भागात आणि छोट्या शहरांमधे कारची खरेदी वाढेल. याचा फायदा कार विक्रेते, तसंच टॅक्सी चालकांना होईल.