वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. कृषी क्षेत्रातील नव्या कररचनेविषयी जाणून घेऊया…
जीएसटी सुधारणेमुळे कृषी क्षेत्रात अनेक अनुकूल बदल होणार आहेत. नव्या कररचनेमुळे खतं, कीटकनाशकं यांच्या किमती कमी होतील. ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे विविध भाग, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कापणी यंत्र या सर्वांवरचा जीएसटी आता ५ टक्के झाला आहे. यामुळे यांत्रिकीकरणाला चालना मिळेल तसंच अंगमेहनतही वाचेल. ठिबक-तुषार सिंचन कमी किमतीत उपलब्ध झाल्यामुळे अधिक जमीन ओलिताखाली येईल, याचा परिणाम उत्पादन वाढीवर होणार आहे. फळं, भाज्या, लोणी, तूप यांच्यावरचा जीएसटी ५ टक्के झाला असून दूध आणि पनीरवरचा जीएसटी शून्य करण्यात आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला मदत मिळणार आहे. सौर ऊर्जेवर आधारित उपकरणांचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के झाला आहे. त्यामुळे सौर पम्पाचा वापर जास्तीत जास्त होईल आणि शेतकऱ्यांचा सिंचनाचा खर्च वाचेल.