प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या २२ सप्टेंबर पासून देशभरात बचत उत्सव सुरु झाला आहे. पादत्राणे उद्योगासाठी जीएसटी चे नवे दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.
(जीएसटीच्या दर सुधारणांमुळे चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. युवा उद्योजकांना दिलासा देण्याच्या उद्देशानं केलेल्या या सुधारणांमुळे उत्पादनाचा खर्च कमी झाला आहे, तसंच दर्जेदार पादत्राणं ग्राहकांना परवडण्याजोगी झाली आहेत.
या नव्या कर रचने नुसार, चामोईस लेदर, लेदर फायबरपासून बनवलेलं कंपोझिशन लेदर, आणि टॅनिंग किंवा क्रस्टिंगनंतर तयार केलेल्या चामड्यावरचा जीएसटी दर १२ टक्क्यावरून ५ टक्के इतका कमी करण्यात आला आहे. यामुळे उत्पादनाच्या खर्चात लक्षणीय घट झाली असून, देशात चर्मोद्योगाला प्रोत्साहन मिळालं आहे.
नव्या कर रचनेनुसार अडीच हजार रुपयांपर्यंत किमतीच्या पादत्राणांवर आता १२ टक्क्या ऐवजी ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे आकर्षक आणि टिकाऊ पादत्राणं मध्यम उत्पन्न गटाच्या आवाक्यात येतील. त्याचप्रमाणे चामड्याशी संबंधित कामावरचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आल्यामुळे सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल.
या उपाययोजनांमुळे केवळ देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार नसून, भारताची निर्यात क्षमताही बळकट होईल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि तरुणांच्या नेतृत्वाखालची उद्योजकता आणि उत्पादन क्षेत्रातलं स्वावलंबित्व वाढवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनालाही बळ मिळेल.)