वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू, पदार्थ स्वस्त झाल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच, शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जीएसटी सुधारणेमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामाबद्दल….
नव्या कररचनेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात साखर कारखाने, फळ-भाज्या प्रक्रिया उद्योग, मत्स्यव्यवसाय, हातमाग उद्योग यासह अनेक लघु आणि मध्यम उद्योग आहेत. जीएसटी सुधारणेमुळे या सर्व क्षेत्रातील वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होणार आहे, त्यामुळे वस्तूंच्या किमतीही कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. तसंच शेतकरी, कारागीर, कामगार आणि व्यावसायिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. परिणामी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास यामुळे मदत मिळणार आहे. प्रक्रिया केलेल्या साखर आणि अन्नपदार्थावरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचे दर ६ ते ७ टक्क्यांनी कमी झाले आहेत. जवळपास ५० लाख शेतकरी आणि २ लाख कामगारांना याचा फायदा मिळणार आहे. प्रक्रिया केलेल्या आणि परीरक्षण केलेल्या माशांवरचा जीएसटी ५ टक्के झाला आहे, याचा लाभ दोन लाख मच्छिमारांना होणार आहे. कापड, चामडे, पैठणी आणि वारली कलाकृतीवरच्या जीएसटी सवलतीमुळे एक लाखापेक्षा जास्त कामगार आणि कारागिरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. वाहन उद्योग, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, विमा या सर्व क्षेत्रांमधे जीएसटी सुधारणा झाल्यामुळे लाखो लोकांना लाभ होणार असून त्यांचं जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे जीएसटी सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळेल यात शंका नाही.