वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच अनेक क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवा करात सुधारणा केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून अनेक व्यवसायाच्या वाढीसाठीही मदत होणार आहे. नव्या कररचनेनुसार बांधकाम साहित्यावरल्या जीएसटीतही सुधारणा झाली आहे. यामुळे बांधकाम व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.
नव्या कररचनेनुसार सिमेंटवरील जीएसटी दर २८ टक्क्यावरून १८ टक्के, वाळू-चुना- विटा यावरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के तसंच संगमरवर आणि ग्रॅनाईट ब्लॉक्सवरील जीएसटीही १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे या वस्तू नागरिकांना परडवणाऱ्या दरात उपलब्ध होऊन यांची मागणी वाढेल.
याचा सकारात्मक परिणाम प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या उपक्रमांवर पडणार असून अधिकाधिक नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हायला मदत मिळणार आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमधे वाढ होईल, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग बळकट होतील आणि रोजगार निर्मिती होईल.