स्वातंत्र्यसंग्रामातले थोर सेनानी, प्रतिसरकारचे प्रणेते, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून नाना पाटील यांना अभिवादन केलं आहे. प्रतिसरकारचे प्रणेते, महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं पवार आपल्या संदेशात म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही क्रांतिसिंहांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं.
मुंबई इथे मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबई महानगरपालिका तसंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातही क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी झाली. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनातही नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.