भारत आणि न्यूझीलंड परस्परांबरोबरचे संबंध वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारत आणि न्यूझीलंड मध्ये सध्या परदेश व्यापार करारावर वाटाघाटी सुरु आहेत. गोयल यांनी आज न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅकक्ले आणि मध्यस्थांबरोबर न्यूझीलंडमध्ये रोटोरुआ इथं त्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
दोन्ही बाजू परस्परांच्या संवेदनशीलतेचा आदर करून भविष्यासाठी सज्ज होत असून, संतुलित व्यापार करारावर काम करत आहेत, तसंच आर्थिक संबंध अधिक दृढ करत आहेत, सहकार्याचे नवीन मार्ग आणि दोन्ही बाजूंचा व्यवसाय आणि ग्राहकांसाठी नवीन संधी खुल्या करत आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
गोयल यांनी आज मॅकक्ले यांच्या बरोबर भारत-न्यूझीलंड सीईओंच्या गोलमेज परिषदेलाही संबोधित केलं. त्यांनी भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं आणि ते म्हणाले की, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वतता यासारख्या क्षेत्रातलं सहकार्य दोन्ही देशांसाठी विकासाच्या नव्या संधी खुल्या करेल.