अनुसूचित जातीतल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्तेवर प्रवेश आणि नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा, आणि आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतल्या अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज मुंबईत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८० व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, मात्र विद्यार्थी आणि युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” प्रदान करण्यात आले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं आता स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आणि संस्थेचे विश्वस्त ॲड. उज्वल निकम यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले.