October 21, 2025 3:22 PM | Govardhan Asrani

printer

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांनी पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले होते. अभिमान, गुड्डी, चुपके चुपके अशा अनेक चित्रपटांमधे त्यांनी मुख्य कलाकारांच्या बरोबरीने प्रेक्षकांवर ठसा उमटवला होता. फकीरा आणि चला मुरारी हीरो बनने या चित्रपटांमधे त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका चिरस्मरणीय ठरली. मुंबईत काल त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असरानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. असरानी यांनी आपल्या भूमिकांमधून असंख्य प्रेक्षकांना आनंद दिला, असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. असरानी यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या विविध मान्यवरांनी समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे असरानी हे एक प्रतिभावान कलाकार होते. नेक दशकं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या असरानी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद असल्याचं काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

असरानी हे फक्त विनोदी अभिनेताच नव्हे तर एक उत्तम शिक्षक होते. त्यांनी एफटीआयआयमध्ये केलेल्या आपल्या अध्यापन काळात अनेक कलाकारांना घडवल्याचं ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत. असरानी यांचं कॉमिक टायमिंग अतिशय सुंदर होतं, त्यांचं निधन धक्कादायक असल्याचं अभिनेता अक्षय कुमार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.