December 7, 2025 1:01 PM | Goa | Nightclub Fire

printer

गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू

गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आग गॅस सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचा अंदाज स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्लबमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचंही वृत्त आहे. आग लागलेल्या ठिकाणावरून सर्व मृतदेह बाहेर काढले असून, पोलीस पुढचा तपास करत आहे, त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल असं गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितलं. 

 

या क्लबला योग्य तपासणी न करता परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांसह, प्रत्येक जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.  दरम्यान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसह अनेकांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शोकग्रस्त कुटुंबांना बळ मिळो, अशी आशा व्यक्त करत जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही आपल्या संवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचं म्हटलं आहे.

 

ही दुर्घटना अत्यंत दुःखदायक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावेलेल्यांसोबत आपल्या संवेदना असल्याचं म्हणत, जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. आपण गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीबद्दल समजून घेतलं, राज्य सरकार पीडितांनी शक्य ती सर्व मदत पुरवत आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.