६४ वा गोवा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. १९६१ साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित परेडचं निरीक्षण केलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. गोव्याच्या नागरिकांनी निसर्ग सौंदर्यानं संपन्न असलेलं आपलं राज्य स्वच्छ ठेवण्याचा आणि इथली शांतता अबाधित ठेवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा मुक्तीसाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अढळ संकल्प आणि समर्पणाबद्दल आदर व्यक्त केला आहे. या शूरवीरांचं देश कृतज्ञतेने स्मरण करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या शूर वीरांचं स्मरण केलं आहे. गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं बलिदान सरकार आणि नागरिकांना गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याची प्रेरणा देत आहे, असं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा मुक्तीसाठी अपार कष्ट घेणाऱ्या लढवय्यांप्रति त्यांनी आदर व्यक्त केला आहे.