भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राजभवनात ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित करत होते.
(ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा हा दोन्ही देशातल्या भागीदारीतल्या व्यापक दृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक असून ही भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार बनेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
ब्रिटनमधले ९ विद्यापीठ भारतात कॅम्पस सुरू करणार असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. स्टार्मर यांच्यासोबत इंडो-पॅसिफीक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणं, युक्रेन-रशिया आणि गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. युक्रेन-रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन दोन्ही देश सहकार्य वाढवत आहेत. द्विपक्षीय व्यापार करारामुळं दोन्हीकडच्या उद्योजकांना बाजारपेठेत संधी मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं स्टार्मर म्हणाले. भारतातून निघताना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणारे गुंतवणुकीचे करार झालेले असतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला योग्य स्थान मिळावं अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
दोन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, शिक्षण, व्यापार आणि गुंतवणूक तसंच पर्यावरण बदल, आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात विविध भागीदारी करार केले. त्यानुसार दोन्ही देश संपर्क आणि नवोन्मेश तसंच एआयच्या क्षेत्रात संयुक्त केंद्र स्थापन करणार आहेत. दोन्ही देशातल्या उद्योजकांचा मंच, भारत – ब्रिटन संयुक्त आर्थिक व्यवहार समिती, हवामान बदल तंत्रज्ञान निधी, आरोग्य क्षेत्रात भागीदारी यासारख्या मुद्द्यांचा त्यात सहभाग आहे.