गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांचं अभिनंदन केलं आहे. ओलिसांची सुटका, इस्रायली सैन्याची माघार घेण्याचा आणि गाझाला मानवतावादी मदत साहित्याचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. नेतान्याहू यांच्याशी काल झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणा नंतर समाज माध्यमावरील संदेशात मोदींनी ही माहिती दिली. दहशतवादाविरुद्ध भारताची ठाम भूमिका यावेळी त्यांनी अधोरेखित केली.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायली शहरांवर हल्ला केला होता त्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझामध्ये हल्ले केले, ज्यामध्ये एकंदर बाराशे नागरिकांचा मृत्यू झाला आणि 251 लोकांना ओलीस ठेवले गेले. दरम्यान, हमास संघटनेच्या गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली लष्करी कारवायांमध्ये 66 हाजारहून अधिक
पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. काल मुंबईत प्रधानमंत्री मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांच्यात झालेल्या चर्चेतही गाझातील परिस्थितीचा उल्लेख करत चर्चा झाली.
प्रधानमंत्री मोदी यांनी काल गाझा शांतता कराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्याशीही चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील सध्या सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींमध्ये झालेल्या सकारात्मक प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही बाजू येत्या काही दिवसांत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सहमत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे, दोनही देशांदरम्यान प्रमुख जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर सहकार्य अबाधित राहील असं संकेत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.