गाझामधे शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज कैरो इथं इस्रायल, हमास आणि अमेरिकेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत इस्रायलने कैद केलेले पॅलेस्टिनी नागरिक आणि हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक यांच्या देवाणघेवाणीबाबतही चर्चा होईल, असं इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
वाटाघाटी सुरू असतानाही इस्रायलने गाझावर हल्ले सुरूच ठेवले आहेत, या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीही इस्रायलने वाटाघाटी नाकारून गाझावर हल्ले केले होते.
दरम्यान, लंडनमधे पॅलेस्टाईन ऍक्शन या गटाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पाचशे जणांना अटक झाली आहे. गाझामधील युद्ध थांबवण्यात यावं या मागणीसाठी युरोपमधे काल मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. गाझामधे मदत घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका करावी अशी मागणीही या आंदोलकांनी केली.