ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सर्वार्थाने गाजलेल्या “वस्त्रहरण”चे नाटककार म्हणून गवाणकर ओळखले जातात. मालवणी बोलीभाषेला आणि लोकनाट्याच्या बाजाला मुख्य प्रवाहातल्या रंगभूमीवर मानाचं स्थान मिळवून देण्याचं श्रेय या नाटकाला जातं. या नाटकाचे ५ हजार ४०० हून जास्त प्रयोग झाले आहेत. मुंबईत सुरुवातीचे दिवस स्मशानभूमीत काढणारे गवाणकर यांनी महानगर टेलिफोन निगममधे नोकरी करता करता लेखनाचा छंद जोपासला. त्यांचं “वात्रट मेले” हे नाटकही प्रचंड लोकप्रिय ठरलं. “वर भेटू नका”, “दोघी”, “वनरुम किचन” ही नाटकं, “ऐसपैस” ही कादंबरी तसंच रविंद्रनाथ टागोरांच्या कथांचा अनुवाद – “चित्रांगदा” त्यांच्या नावे जमा आहेत. ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं.
गवाणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. इतर अनेक मान्यवरांनी गंगाराम गवाणकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.