१० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला उद्यापा्सून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी होत आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे.
गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी आज घरोघरी हरतालिका पूजन झालं. उद्या सर्वत्र सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींची वाजतगाजत स्थापना होईल. मुंबईत दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त सार्वजनिक आणि दोन लाखांपेक्षा जास्त घरगुती गणपतींची स्थापना केली जाते. यंदाही लालबागचा राजा, सिद्धिविनायक अशा सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणपतींच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज होत आहे. गणपतीचं मखर, आरास, सजावटीचं सामान, फुलं इत्यादी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लगबग आहे. बस आणि रेल्वेस्थानकांवर गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
हा सण अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी महानगरपालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आत्तापर्यंत जवळपास एक हजार टन शाडू माती मूर्तिकारांना मोफत पुरवली आहे. हा सण सुरक्षितरीत्या साजरा व्हावा, यासाठी सार्वजनिक आरोग्य, रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण विभाग सज्ज आहेत. गणरायाच्या आगमनाप्रमाणेच विसर्जनही निसर्गस्नेही करण्यासाठी ६८ नैसर्गिक विसर्जनस्थळांसोबतच महानगरपालिकेनं जवळपास ३०० कृत्रिम तलाव तयार केले असून विसर्जनस्थळी निर्माल्य कलशही उपलब्ध करून दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.