राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने स्थानिक वैशिष्ट्यांसह आणि नवनवीन कल्पना राबवून हा उत्सव साजरा होत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमधे गर्दी होत आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंडळांनी आणि प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. मुंबईत मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. बेस्ट उपक्रमातर्फे खास गणपती दर्शनासाठी विशेष मार्गावर बसगाड्या चालवण्यात येत आहेत. पुण्यात गणेशोत्सवाची आरास पाहण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकांवरुन उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. गणेशोत्सवानिमित्त जनजागृतीपर आणि सांस्कृतिक कलादर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल असल्याचं ठिकठिकाणच्या मंडळांच्या कार्यक्रमपत्रिकांवरुन दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा दोन हजार ९४६ मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात १६० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबवला जात आहे.
नांदेड जिल्ह्यात शहरी भागात १ हजार सार्वजनिक तर ग्रामीण भागात तीन हजाराहून अधिक मंडळाकडून श्रींची स्थापना करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ५२ जणांना तडीपार करण्यात आलं आहे. ५२७ सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ३ हजार २६७ व्यक्तीवर प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत. त्याचवेळी ९०४ जणांना सण, उत्सव काळात जिल्ह्यातून बाहेर काढले जात असल्याचं पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितलं.
बीड शहरासह जिल्हाभरामध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी बालगोपाळांसह ज्येष्ठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
नंदुरबार मधला प्रथम मानाचा गणपती असलेल्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपती यांची आज मोठ्या भक्ती भावात स्थापना करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही साच्याविना काळ्या मातीपासून ही मूर्ती रथावर साकारतात.
धुळे शहरात बहुतांश ठिकाणी एक दिवस आधीच गणेश मूर्ती मंडपात विराजमान झाल्या आहेत. आज शास्त्रोक्त पध्दतीने प्राणप्रतिष्ठा होत आहे. धुळे जिल्ह्यात ७३६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यात २४ ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथल्या रावल गढी वर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली.
अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना विधीवत पार पडली. मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
जनसामान्यांबरोबरच विविध क्षेत्रातले नामवंत मान्यवर उत्साहाने या सणाचा आनंद लुटत आहेत.