गगनयान या पहिल्यावहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार असून ही फक्त तंत्रज्ञानातली प्रगती नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय आहे, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला.
मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन्स शुभांशू शुक्ला, प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप या चार अंतराळवीरांचा आज नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात सत्कार झाला, त्यावेळी ते बोलत होते. अंतराळ क्षेत्रातलं भारताचं योगदान फक्त उपग्रह सोडण्यापुरतं मर्यादित नसून चंद्रापासून ते मंगळापर्यंत भारताचं पाऊल पडत आहे, असं सिंह यांनी नमूद केलं.