विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा, असं आग्रही प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत आज केलं.
जी-२०नं प्रदीर्घ काळापासून जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना दिली आहे, मात्र सध्याच्या आराखड्यात मोठी लोकसंख्या ही संसाधनांपासून वंचित राहत आहे, तसंच यात निसर्गाला ओरबाडून घेतलं जातं, यामुळे उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा सामना आफ्रिकेनं केला आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं.
नवी दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेत घेतलेले काही ऐतिहासिक निर्णयांमध्ये वाटचाल सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भारताच्या संस्कृतीत रुजलेला एकात्मिक मानवतावाद, संपूर्ण जगाच्या साथीनं प्रगतीवर भर देतो, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
जी-२० अंतर्गत जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना, जी-२० आफ्रिका-कौशल्यवाढ उपक्रमाची सुरुवात, जी-२० जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अंमली पदार्थ आणि दहशतवाद यांचा सामना करण्यासाठीचा उपक्रम असे महत्त्वपूर्ण प्रस्ताव मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले.
जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी आज यूकेचे प्रधानमंत्री किएर स्टार्मर यांची भेट घेतली. तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.