जी ट्वेंटी नेत्यांच्या तीन दिवसीय शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पोहोचले. ते या परिषदेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होऊन शाश्वत विकास, वातावरण बदल कृती कार्यक्रम, जागतिक शासकीय सुधारणा इत्यादींसह भारताचा प्राधान्यक्रम मांडतील.
या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा तसंच इतर अनेक जागतिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतील. इब्सा अर्थात भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका यांच्या नेत्यांच्या बैठकीतही ते सहभागी होतील. दृढ ऐक्य, समानता आणि शाश्वतता ही यावेळच्या जी ट्वेंटी परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेचं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे. आपत्ती निवारणाचं बळकटीकरण, कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी कर्ज शाश्वततेची हमी, न्याय्य ऊर्जा वितरणासाठी वित्त पुरवठा, तसंच समावेशी आणि शाश्वत वाढीसाठी दुर्मिळ खनिजांचा उपयोग, यांना दक्षिण आफ्रिकेनं प्राधान्य दिलं आहे.