अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. परंतु भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली.त्यावेळी ते बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या समृतीप्रीत्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पातल्या पहिल्या नदीजोडणीच्या कामाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली. मध्य प्रदेशात केन आणि बेतवा या दोन नद्यांची जोडणी करण्यात येणार आहे. या विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
