माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मूत्रपिंडविकारावर उपचार घेत होते. दीड महिन्यापूर्वी त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती.
शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते. दुमका मतदारसंघातून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते. मात्र चिरुडीह हत्याकांडात त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. २००७ मधे दिल्ली उच्च न्यायालयात त्यांची सुटका झाली.
संथाल जमातीतले सोरेन यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी दीर्घ लढा दिला होता. झारखंडचं मुख्यमंत्रीपद त्यांनी तीन वेळा भूषवलं.
झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होते. शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल झारखंडमधे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आहे.