जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी तेत्सुया यामागामी यानं आज न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली. ८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये नारा इथं निवडणूक प्रचारसभेदरम्यान यामागामीनं शिंजो अबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरून गेला होता आणि युनिफिकेशन चर्चकडे तसंच राजकीय नेत्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधांकडे लोकांचं लक्ष वळलं होतं.
आज यामागामीची पहिली सुनावणी होती. त्याची आई युनिफिकेशन चर्चची अनुयायी झाल्यामुळे युनिफिकेशन चर्चबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला होता. अबे यांच्यावर गोळी झाडल्यामुळे लोकांचं लक्ष या गटाकडे वळेल आणि त्याच्यावर टीका होईल, अशा विचारातून त्यानं हा हल्ला केला होता, असं सरकारी वकिलांनी या सुनावणीत सांगितलं.