इराणचे माजी युवराज रेझा पहलवी यांनी सत्तांतराची मागणी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी आणि इतर इराणमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा त्यांनी केला. खोमेनी सत्तेत आल्यापासून पहलवी दुसऱ्या देशात आश्रयाला आहेत. सत्ता सोडली तर कायदेशीर मार्गाने, निष्पक्षरित्या तुमच्याविरोधात खटला चालवला जाईल. या संकटाच्या काळात देशात स्थैर्य, स्वातंत्र्य आणि न्याय देण्यासाठी मी तयार आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकशाही मार्गानं सत्तांतर करण्याची इच्छा असल्याचं पहलवी म्हणाले.
इराणच्या संसदेनं जगातला सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला आहे. या मार्गावरची सागरी वाहतुक बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे. या परिषदेनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी सैन्याला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी नौदलाद्वारे संघर्षाची तयारी अमेरिका करत असल्याचं वृत्त आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाशी सहकार्य स्थगित करण्यासाठी इराणची संसद एक विधेयक मंजूर करण्याची शक्यता आहे. इराणची शांततापूर्ण कारवायांची कोणतीही योजना नसून IAEA ने त्यांच्या वचनबद्धतेचं पालन केलं नाही आणि ही संस्था राजकीय साधन बनल्याचं इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी आज संसदेत म्हटलं आहे.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मॉस्कोला पोहोचले. इराणवर झालेला हल्ला अनावश्यक आहे असं पुतीन यावेळी म्हणाले.
रशिया आणि चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती, या बैठकीत तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला.