कॅनडामधील माजी मध्यवर्ती बँकर मार्क कार्नी यांची सत्ताधारी लिबरल पक्षानं कॅनडाच्या नेतेपदी निवड केली असून त्यामुळे ते कॅनडाचे पुढचे प्रधानमंत्री बनणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या काही दिवसांत ते प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील. ५९ वर्षीय कार्नी हे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. ट्रूडो यांनी जानेवारीमध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली होती.
कार्नी यांनी यापूर्वी बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून काम केलं असून २०१३ मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे नेतृत्व करणारे ते पहिले विदेशी नागरिक बनले. अमेरिकेद्वारे घोषित व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर कार्नी यांच्याकडे देशाचं नेतृत्व आलं आहे. आपल्या भाषणात कार्नी म्हणाले की, कॅनडाला काळ्या दिवसांचा सामना करावा लागत आहे, अमेरिकन लोक आदर दाखवत नाहीत तोपर्यंत अमेरिकेच्या वस्तूंवरील प्रत्युत्तरात्मक शुल्क कायम ठेवण्याचं आश्वासनही त्यांनी दिले.