भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आयुष मंत्रालयाशी सल्लामसलत करून आयुर्वेदिक आहाराची यादी जारी केली आहे. २०२२ मध्ये अन्न सुरक्षा आणि मानके – आयुर्वेद आहार नियम लागू झाल्यानंतर, उचलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारताच्या पुरातन काळापासून नावाजलेल्या अन्नपदार्थांच्या ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणलं जाणार आहे. अधिकृत आयुर्वेदिक ग्रंथांमधील पाककृती, घटक आणि प्रक्रियांवर आधारित अन्न पदार्थाना यामुळे मान्यता मिळून ग्राहक आणि व्यवसायांना आत्मविश्वास मिळणार आहे.
आयुर्वेदिक आहार उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसायांना विश्वसनीय संदर्भ सामग्री देखील याद्वारे प्रदान केली जाणार आहे. आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रताप राव जाधव यांनी लोकांना आरोग्याच्या दीर्घकालीन फायद्यासाठी दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक आहाराचा समावेश करण्याचं आवाहन केलं आहे. आयुर्वेदिक आहार शरीराच्या पोषणाबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
या उपक्रमामुळे अन्न उद्योगामधील नियामक स्पष्टता वाढून चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद-आधारित पोषणाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला जाईल.