अन्न आणि औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधे देणाऱ्या राज्यातल्या ८८ विक्रेत्यांना औषध विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर १०७ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पुण्यात २० औषधविक्रेत्यांवर नोटीस आणि निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पुणे विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा औषधविक्री संघटनेने केली आहे.
कोल्ड्रीफ कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेशात नऊ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने या सिरपच्या विक्री आणि वितरणावर बंदी घातली. त्यानंतर देशभरात इतर कंपन्यांच्या कफ सिरपची तपासणी सुरू आहे.