पंजाबमध्ये पावसानं काहीसा दिलासा दिल्यानं राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २२ जिल्ह्यातली १ हजार ९४८ गावं प्रभावित झाली आहेत तर सुमारे ३ लाख ८४ हजार लोक बाधित झाले आहेत. पूरग्रस्त भागातून सुमारे २२ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. भाक्रा धरणातून आता अतिरिक्त विसर्ग होणार नसल्यामुळे भीतीचं कारण नाही असं भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळानं सांगितलं आहे. तसंच दोन आंतरमंत्रीय केंद्रीय पथकांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, पुरामुळे मोठं नुकसान झालेल्या पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी एक हजारपेक्षा जास्त प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात केले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. हे स्वयंसेवक अति दुर्गम गावांपर्यंत मदतीचा पुरवठा आणि आवश्यक सेवा पोहोचवतील.